महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या आक्षपार्ह विधानावरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या विधानाचा सत्ताधाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर चक्क पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरच राज्यपालांच्या विधानांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेत त्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांच्या विधानांचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.
शरद पवारांनी शनिवारी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती. “हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे”, असं शरद पवार म्हणाले होते. आज पुन्हा एकदा उस्मानाबादमधील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
“आता लोक म्हणतात, उगीच…”
“कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा पद आणि अधिकार यांचं तारतम्य राहात नाही. महाराष्ट्रात कुणीतरी भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच, कुणीतरी दुसऱ्यांनीच त्यांना मोठं केलं. त्यांनी सावित्रतीबाई फुलेंबद्दलही भाषण केलं. लोक म्हणाले आता काय करायचं? म्हटलं सोडून द्या ना. काय कुणी विचारणार नाहीये. नको ते बोलल्यानंतर लोक म्हणतात उगीच याच्या नादी लागायला नको. यात काही दम नाही. यात काही अर्थ नाही. याच्याकडून नीट काही बोललं जाणार नाही. म्हणून त्याचा विचार करण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“..तर राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस्स झाला”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राज्यपालांच्या विधानावर अप्रत्यक्ष शब्दांत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधानांकडेच तक्रार केली. “पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. मनात कुणाच्याही द्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज्यपाल?
२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी देखील राज्यपालांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावेळी राज्यपालांनी त्यांच्या विवाहाच्या वयाविषयी हे विधान केलं होतं. याचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला होता.
या व्हिडीओमध्ये “राज्यपाल हे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय. त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील”, असं विधान त्यांनी केल्याचं दिसत आहे.