नगर : पारनेर नगरपंचायतमधील शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा भालेकर व नगरसेवक भूषण शेलार या दोघांनी आज, गुरुवारी आमदार नीलेश लंके व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा पारनेरमधील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवेश केलेल्या दोघांसह राष्ट्रवादीच्या एकूण ९ नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली. गटनेता म्हणून श्रीमती भालेकर यांची तर त्यांचे पती अर्जुन भालेकर यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ७, शिवसेना ६, शहर विकास आघाडी २, भाजप व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ झाल्याने पारनेर नगर पंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र निवडणूक निकालानंतर लगेचच आ. नीलेश लंके यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यांनी शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे, उद्योजक अर्जुन भालेकर यांच्यासह अपक्षांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत चेडे, भालेकर पती-पत्नी, नगरसेवक शेलार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आ. लंके व जिल्हाध्यक्ष फाळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जणांची गटनोंदणी करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा