भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह आहे असं म्हटलं आहे.
क्लाईड क्रास्टो यांचं ट्वीट –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट केलं असून, नितीन गडकरी यांचा भाजपाच्या संसदीय मंडळात समावेश न होणं एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचं दर्शवत असल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी
यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “जेव्हा तुमचं कौशल्य व क्षमता वाढतात, आणि तुम्ही नेतृत्वासमोर आव्हान उभं करता तेव्हा भाजपा तुमचं महत्व कमी करतं,” अशी टीका त्यांनी केली आहे. कलंकित झालेल्यांना पदोन्नती दिली जाते असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
भाजपा संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीची पुनर्रचना करताना माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना वगळण्यात आलं आहे. गडकरी यांच्याऐवजी पक्षाने राज्यातून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक समितीत स्थान दिलं आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि अमित शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा – “दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण…”, आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांसमोर ठेवली अट; म्हणाले “त्यांचा गेम केला”
फडणवीस राष्ट्रीय राजकारणात?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केलं असल्याचं मानलं जात आहे. तसंच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.
कोणाला संधी –
भाजपाच्या संसदीय मंडळात काही नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपूरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जातिया यांचा समावेश आहे.
दरम्यान निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शाहनवाज हुसेन यांना निवडणूक समितीमध्ये स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे सोनेवाल आणि येडियुरप्पा यांना दोन्ही ठिकाणी स्थान मिळालं आहे.