पश्चिम महाराष्ट्रावर निसटू पाहणारी पकड घट्ट करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
धनगर आरक्षण, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख, ना खाउंगा, ना खाने दुंगा म्हणणारा चौकीदार या संभाषणाच्या चित्रफिती दाखवून ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल चित्रफितीतून भाजपाला घेरण्याचा फंडा राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत गाजू लागला आहे. सांगली व इस्लामपूरच्या सभेत या चित्रफितींचे प्रदर्शन करून ‘एक ही भूल’ टाळण्याचा सल्ला मार्मिकपणे सांगून राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रावर निसटू पाहणारी पकड घट्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
जिल्ह्यातील आटपाडी, जत, मिरज, सांगली, तासगाव, पलूस, शिराळा आणि इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचे आयोजन गेल्या दोन दिवसांत करण्यात आले. या सभेच्या गर्दी झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या चित्रफिती प्रदíशत करण्यात आल्या, आणि या आश्वासनाचे काय झाले याची विचारणा करणारी क्या हुआ तेरा वादा ही ध्वनिफीत प्रदíशत करून लोकांना जाणीव करून दिली जात आहे.
भाजपाने परदेशातील काळा पसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ये तो चुनावी जुमला था असे दिलेले उत्तर, पहिल्या कॅबिनेटला धनगर आरक्षणाचा विषय हातावेगळा करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन आणि सध्याची स्थिती, ना खाने दुंगा, ना खाउंगा असे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विजय मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांचे घोटाळे, हे सांगून शेवटी क्या हुआ तेरा वादा हे गीत असणारी ध्वनिफीत प्रदíशत केली जात आहे. याला जमलेल्या लोकांकडून जोरदार टाळ्या आणि शिट्टय़ांच्या आवेशात प्रतिसाद मिळत आहे.
याचबरोबर विधानसभेत भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी काळे, पांढरे, लठ्ठ, गलेलठ्ठ उंदीर किती मारले याबाबत केलेल्या भाषणाची ध्वनिफिती ऐकवली जात आहे. यातून भाजपाला घेरण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेतून होत आहे. या माध्यमातून आंदोलनाला धार आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा गड शाबूत ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
भाजपअंतर्गत वादाचा फायदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंमुळे त्यांचेच सरकार अडचणीत येत आहे. खडसे अणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा संघर्ष सर्वाना ज्ञात असला, तरी हा संघर्ष विरोधकांच्या पथ्यावर पडू लागल्याचे दिसते. मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या योजनेचा घोटाळा खडसेंनी बाहेर काढला. त्या वेळीही विरोधी पक्षांनी खडसेंना साथ दिली.
राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सभा, पदयात्राही घेण्यात येत आहेत. सभांची नेहमीची पद्धत मोडून चित्रफितीद्वारे अनेक गोष्टी जनतेसमोर मांडण्याचा नवा फंडा त्यांनी शोधला आहे.
भाजप नेत्यांचे बदललेले रंग दाखविण्यासाठी पूर्वीच्या आणि आताच्या भाजप नेत्यांच्या भाषणाच्या चित्रफिती त्यांनी संकलित केल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चित्रफिती यात अधिक आहेत. याशिवाय या चित्रफितींमध्ये सर्वाधित लक्षवेधी ठरलेली चित्रफीत एकनाथ खडसेंची आहे. उंदीर घोटाळ्यावर त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाची ही चित्रफीत राष्ट्रवादीच्या सभांमधून दाखविण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज आल्यानंतर या गोष्टीस अधिक धार देण्यात येत आहे.
क्या हुआ तेरा वादा
धनगर समाजाच्या एका कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी फडणवीस भाषण करण्यास उठत असताना संयोजकांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ हिंदी चित्रपट गीत लावले होते. ती चित्रफीतही दाखविण्यात येत असून यावर उपस्थितांत हशा पिकत आहे.