यवतमाळचे काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींध्ये आमने-सामने लढत होण्याच्या शक्यतेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पोटनिवडणुकीची तारीख निर्वाचन आयोगाने अद्याप जाहीर केली नसली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच सेना-भाजप युतीने ही जागा लढवण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने व ही जागा काँग्रेसची असल्याने स्वाभाविकच काँग्रेस या जागेवर दावा करणार आहेत, मात्र पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकानंतर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ३६ चा आकडा झालेला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने सेना-भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवून जिल्ह्य़ाच्या गेल्या ५० वर्षांंच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले आहे. यवतमाळ पालिकेतही राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत वाटा मिळवून नगराध्यक्षपदाचे दान भाजपच्या झोळीत टाकले तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर ही पोटनिवडणूक स्वबळावर लढायचीच, असा निर्धार दोन्ही काँग्रेसने केल्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, अशी आशा सेना-भाजप युतीला आहे. या युतीत ही जागा भाजप लढणार आहे, हेही स्पष्ट आहे, पण भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे अजूनही या पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पार पडलेल्या नाहीत. जिल्हा आणि शहराध्यक्षपदाचा वाद प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार अजूनही सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत पक्षाची स्थिती कशी राहील, हाही चच्रेचा विषय आहे.
उल्लेखनीय म्हणजे, काँग्रेसने जर निलेश पारवेकर यांच्या घराण्यातील एखाद्याला उमेदवारी दिली तर कदाचित राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार नाही, मात्र तसे झाले नाही तर काँग्रेसच्या विरोधात लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. अधिकृतरित्या ही जागा राष्ट्रवादीला मिळणार नाही, हे स्पष्ट असले तरी घडय़ाळ चिन्हावर स्वतंत्रपणे लढण्याची मानसिकता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरीया यांच्याजवळ व्यक्त केली असून आपल्या या भावना त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असा आग्रह धरला आहे. ही सर्व वस्तुस्थिती आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता येणाऱ्या या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने होणार, असे चित्र आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने जर आघाडीचा धर्म पाळला नाही, तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवाराविरुध्द आपला उमेदवार उभा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिला आहे.
पारवेकर यांच्या घराण्यात निलेशच्या आई कांताबाई पारवेकर, पत्नी नलिनी, भाऊ योगेश आणि काका अण्णासाहेब पारवेकर, असे चौघे जरी उमेदवार होऊ शकत असले तरी वयोमानामुळे आई लढणार नाहीत, हे स्पष्ट आहे. पत्नी नलिनी कर्नाटकातील असल्याने व त्यांना मराठी भाषेची समस्या असल्याने, तसेच त्यांचा स्वभाव राजकारणापासून कोसो दूर राहण्याचा असल्याने त्यांच्या लढण्याची शक्यताही अर्थातच धूसर झाली आहे. योगेश पारवेकर यांच्यात निलेश पारवेकरांसारखा व्यापक जनसंपर्क आणि धडाडी नाही, तर अण्णासाहेब पारवेकर राष्ट्रवादीत असल्याने काँग्रेसतर्फे त्यांच्या उमेदवारीचा प्रश्नही उद्भवत नाही. याचा अर्थ, पारवेकर घराण्यात काँग्रेसतर्फे उमेदवारीची शक्यता नसल्याने राष्ट्रवादीचे काँग्रेसशी आमना-सामना करण्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला सव्वा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आमदारकी मिळणार नाही तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत  उमेदवारीसाठी चांगली स्पर्धा दिसत आहे. कारण, २०१४ च्या निवडणुकीत जिंकणाऱ्या उमेदवाराला पुन्हा आपला दावा सांगता येईल.

Story img Loader