Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नाशिक महानगरातील शरणपूर, कॉलेज रोड परिसरातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक जॉय उत्तमराव कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपनगर परिसरातील माजी नगरसेविका सुषमा रवी पगारे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज मुंबई येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर अजय बोरस्ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची एक लाट आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं वलय आहे. येणाऱ्या काळात नाशिकमध्ये शिवसेना पक्ष दिसेल. आता ठाकरे गटानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट व काँग्रेस पक्षातून माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे जाळे आता नाशिकमध्ये वाढत आहे. नाशिकमध्ये आगामी महापालिकेत भगवा फडकणार आहे”.
हे ही वाचा >> “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
पक्षप्रवेशानंतर सुषमा पगारे व जॉय कांबळी काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जॉय कांबळी म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले आहे हे जाणून आम्ही या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहोत. काँग्रेसमध्ये इतकी वर्षे होतो आता शिवसेना वाढवणार आहोत. काँग्रेसने पाहिजे तशी मदत केली नाही ही मोठी खंत आहे. काँग्रेसमध्ये आता सक्षम नेतृत्व राहिलेलं नाही, त्यामुळे आम्ही आमची व्यथा कोणाकडे मांडणार?” तर, सुषमा पगारे म्हणाल्या, “शिवसेनेत मी पक्षप्रवेश केला आहे याचा मला आनंद आहे. सामान्य महिला म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहे. आता शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे, त्यामुळे आता मागे हटणार नाही”.
हे ही वाचा >> “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
शिवसेनेचं नाशिक महापालिकेवर लक्ष
या पक्षप्रवेशाबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “नवीन वर्षामध्ये मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे आणि हे वारंवार सिद्ध होतंय. आमच्या पक्षात अनेकांचे प्रवेश होत आहेत. शिवसेनेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे माजी नगरसेवक पक्ष प्रवेश करत आहेत. नाशिक महापालिकेत १० जागांवर आमचे नगरसेवक निवडून येतील. आम्ही तिथल्या नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे”.