आता पोलिसांनाच संरक्षणाची गरज
आमदारांनी पोलीस उपनिरीक्षकास मारहाण करण्याचे प्रकरण गाजत असतानाच होळीच्या रात्री हातात तलवारी घेऊन बेधुंदपणे नाचणाऱ्या तरुणांना मज्जाव करणाऱ्या येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्यावर नगरसेवकाच्या मुलांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक व त्याच्या दोन मुलांसह २० ते ३० जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक व त्याचे दोन्ही मुलगे फरार आहेत.
शहराच्या जुने धुळे भागात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास काही तरुण हातात नंग्या तलवारी घेऊन नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सचिन बडगुजर या संशयितास ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या देवेंद्र ऊर्फ देवा सोनार याने तलवारीने साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या डोक्यावर वार केले. देवा हा राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा मुलगा आहे. यावेळी सोनार यांचा दुसरा मुलगा भूषणनेही पोलीस कर्मचारी संजय बोरसे यांच्यावर तलवारीने वार केले. यावेळी जमावातील काही जणांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या छातीला तलवार लावून त्यांना अटकाव केल्याचे आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात देवेंद्र ऊर्फ देवा चंद्रकांत सोनार, नगरसेवक चंद्रकांत मधुकर सोनार, भूषण सोनार, विजय काळे, भूषण गवळी, सचिन बडगुजर यांसह २० ते ३० जणांविरुद्ध निरनिराळ्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे
 शहरातील दुसऱ्या घटनेत साक्री रस्त्यावरील भीमनगरमध्ये तलवार फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या देविदास जाधव (३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने सुरू असलेली गुंडगिरी पोलिसांनी निर्दयपणे नेस्तनाबूत करावी, अशी अपेक्षा धुळेकरांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader