आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, विकासकामांचे श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांमध्ये कलह सुरू झाला असून शनिवारी महिरावणी येथे आयोजित रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्यात त्याची प्रचीती आली. शिवसेनेचे. आ. बबन घोलप यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला.
शनिवारी विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे आ. घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार तिरडशेत येथील कार्यक्रम झाल्यावर आ. घोलप, मनसेतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले हेमंत गोडसे आदी नेते व पदाधिकारी महिरावणीत आले. या ठिकाणी महिरावणी-धुडगाव या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे लोकार्पण होणार होते. याची माहिती मिळाल्याने राष्ट्रवादी व मनसेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले. या रस्त्याच्या कामाशी आ. घोलप यांचा कोणताही संबंध नसल्याची तक्रार त्यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आणि खा. समीर भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्याचे काम झाल्याचा दावा करण्यात आला. या कामासाठी ३९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमस्थळी उभारलेला फलकही कार्यकर्त्यांनी काढून घेतला. या घटनाक्रमामुळे आ. घोलप व सेनेच्या इतर नेत्यांना कार्यक्रम रद्द करून माघारी फिरावे लागले. या संदर्भात आ. घोलप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही गोंधळ झाला नसल्याचे सांगितले. परंतु, उपरोक्त रस्त्याचे काम अर्धवट असल्याने त्याचे उद्घाटन करणे योग्य नव्हते. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. रस्ता पूर्ण झाल्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून संयुक्तपणे उद्घाटन केले जाईल, असेही आ. घोलप यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा