राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज (१७ फेब्रुवारी) निरोप देण्यात आला. कोश्यारी यांची कारकीर्द अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे ते टीकेचे धनी झाले. त्यांच्या कार्यकाळात कोश्यारी यांनी नेहमी भाजपाला पुरक अशी भूमिका घेतली, अशी टीका महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून करण्यात आली. दरम्यान आज निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादीने कोश्यारी यांचे थेट प्रगतीपुस्तक जारी केले आहे. या प्रगतीपुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादींने कोश्यारी यांच्या प्रगती पुस्तकाला ‘अधोगती पुस्तक’ म्हटले आहे. तसेच या अधोगती पुस्तकावर खास शेरा दिला आहे.

त्यांची सुरुवात बालवाडीपासून करावी

राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये भगतसिंह कोश्यारी यांचे एक प्रगतीपुस्तक जारी केले आहे. या प्रगतीपुस्तकात राष्ट्रवादीने कोश्यारी यांना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांत गुण दिले आहेत. राष्ट्रवादीने कोश्यारी यांना इतिहासात शून्य गुण दिले आहेत. तसेच भूगोलमध्ये ३५, नागरिकशास्त्रमध्ये १६ सामान्य ज्ञान विषयात ३४ तर कला विषयात पैकीच्या पैकी म्हणजेच १०० गुण दिले आहेत. विशेष म्हणजे या प्रगतिपुस्तकावर राष्ट्रवादीने एक खास शेरा दिला आहे. ‘सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता त्याची सुरुवात बालवाडीपासून करणे योग्य राहील,’ असे या शेरामध्ये राष्ट्रवादीने म्हटले आहे.

विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर गच्छंती

सोबतच राष्ट्रवादीने प्रगतीपुस्तासह एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात ‘पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे,’ असे उपहासात्मक भाष्य राष्ट्रवादीने केले आहे.

नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी

दरम्यान, ॉभगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. तर राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.

Story img Loader