२०१९ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही, अशी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि न्यूमोनिया भाजपाला झाला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी टीका केल्यानंतर मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे.
“साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे,” अशी मिश्किल टीकाही महेश तपासे यांनी केली.
वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी जशास तसे उत्तर देताना राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे आव्हान दिले होते.
“पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही”
“जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही,” अशी टीका पडळकरांनी केली होती.
“त्यांची (राष्ट्रवादीची) ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असं सांगावं लागतंय. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावं लागतंय की भाजपाला मी येऊ देणार नाही,” असही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.
“शरद पवार ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत”
दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतरही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे,” असे पडळकर म्हणाले होते.