कराड : राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहताना दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रसकडून मात्र, सतत पाठीत खंजीर खुपसण्याचे काम होत राहिल्याने या रागापोटीच आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेनेचे नाराज आमदार महेश शिंदे यांनी समाजमाध्यमासमोर बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले महेश शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस व विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राग व्यक्त करत होते. शिवसेनेच्या आमदारांना ५० ते ५५ कोटींचा निधी दिला जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रसच्या आमदारांना हाच निधी ७०० ते ८०० कोटी रुपयांपर्यंत दिला गेल्याची बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उघड केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आम्हा आमदारांच्या मतदारसंघात किती निधी दिला याचे आकडे मागितले असता चुकीचे आकडे पुढे आल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचंबित करणारी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केल्याचे समोर आले. परंतु, या प्रकारात पुढे काहीच बदल झाला नाही. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये पराभूत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विकासकामांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निधी दिला गेला होता.

आम्हा शिवसेनेच्या आमदारांना कार्यक्रमांना बोलवले जात नव्हते. या प्रकारांबाबत मुख्यमंत्र्यांशी आमच्या बैठकाही झाल्या. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी परिस्थितीत सुधारणा होईल असे सांगतानाच अनेक गोष्टींना स्थगितीही दिली. पण, मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीपत्रांना केराची टोपली मिळाली. आमच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने विरोधकांची सतत कामे होत गेली. पुढील आमदार राष्ट्रावादीचाच होईल, शिवसेनेचा आमदार दिसणार नाही ही वक्तव्ये मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. यावर हे सारे थांबेल असे मुख्यमंत्री सांगत होते. पण, अशाप्रकारची कुठलीही गोष्ट थांबली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्हाला काम करणे अशक्य होते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याच्या रागापोटीच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.