औरंगाबादच्या जागेसाठी राष्ट्रवादीचा हट्ट
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>
समोर बसलेले श्रोते भारावून गेले होते. ‘संविधान बचाव’ची भूमिका मांडल्यानंतर कन्हैय्याकुमार यांना डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आझादीच्या जयघोष करण्याची विनंती केली. कन्हैय्याकुमार यांनी हातात डफ घेतला. त्यांचा आवाज वाढू लागला. ‘तो हम क्या चाहते.आझादी, जातीयवाद से..आझादी, मनुवाद से.. आझादी’ आवाज टीपेला जात होता. मुठी आवळून सारे जण सहभागी होत होते. कन्हैय्याकुमार किती तल्लिनतेने जयघोष करीत होते ते श्रोत्यांनी पाहिले. व्यासपीठावर तेव्हा डाव्या चळवळीतील नेत्यांबरोबर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण होते. कार्यक्रम संपला तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढविणाऱ्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याचा भाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर होता..
जाहीर सभेनंतर एक साहित्य- सांस्कृतिक स्वरूपाचा कार्यक्रम देवगिरी महाविद्यालयात अलीकडेच झाला- ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांचा सत्कार. महाविद्यालयातील तरुणांची संख्या अधिक. शहरातील अनेक मान्यवरांची हजेरी. बोलणारे वक्ते होते- ज्येष्ठ विश्लेषक योगेंद्र यादव. हिंदी भाषेचा गोडवा. मांडणीची पद्धतही मृदू. पण, मुद्दे मांडताना विचार स्पष्ट आणि कणखर. त्यांच्या खास शैलीत सांगत होते. विविधता हेच आपले शक्तीस्थान आहे. आजच्या काळात होणारे वैचारिक हल्ले आणि त्यातून आपण स्वत:ला कसे सावरायचे याचे चिंतन ते मांडत होते. त्यांचे भाषणही भारावून टाकणारे होते. भारतीय दृष्टिकोनातून सांस्कृतिक प्रतिमांडणीची आवश्यकता ते सांगत होते. नवी वैचारिक जडणघडण कशी व्हावी त्याचे सूत्र महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोराच्या विचारात कसे दडले आहे, याची ओळख करून देताना सध्याची राष्ट्रवादाची मांडणी जर्मन मानसिकतेतून कशी सुरू आहे, याचे विवेचन योगेंद्र यादव करीत होते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, गंभीरपणे चिंतन मांडत सरकारला अडचणीचे वाटणारे प्रश्न उपस्थित करणा-या मंडळींना निमंत्रित करणारे कार्यक्रमाचे आयोजक होते, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण.
तत्पूर्वी म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी २९ जुलै २०१७ रोजी देवगिरी महाविद्यालयात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा सत्कार होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होते, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी. तेव्हा ते म्हणाले होते, पवार साहेब कुशल संघटक आहेत. त्यांनी नेहमी सरदारांना एकत्र केले. आमच्या पक्षात आणि कॉंग्रेसमध्ये जे ग्रामपंचायतीमध्ये निवडून नाही येत. ते लोकसभेत येतात. आमचा पक्ष हवेवर चालतो आणि पवारांचा सरदारांवर. तेव्हा गडकरी यांचे हे विधान मोठे गाजले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजपचे बडे नेते आवर्जून हजेरी लावायचे. भाजप- राष्ट्रवादीचे संबंध मधुर आहेत की, असा संदेश त्यात होता. तो अगदी अलीकडेपर्यंत कायम होता. एरवी पंतप्रधानाचे नाव न घेता टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते राफेल प्रकरणावरून वक्तव्ये करू लागले. संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आणि जिल्हा पातळीवरील आयोजनातील प्रमुख पाहुण्याचे चेहरे बदलू लागले. टीकेचा उंचावत जाणाऱ्या सुराला आता राष्ट्रवादीची साथ मिळू लागली आहे.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कार्यक्रमांना समाजवादी आणि डाव्या चळवळीतील नेत्यांची हजेरी वाढावी, असे प्रयत्न हमखास होऊ लागले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून टीका करण्यापेक्षा एखादे स्वतंत्र व्यासपीठ असावे असे कँाग्रेस नेत्यांनाही वाटू लागले आहे. औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेल व सीबीआयवरील गोंधळावर एक सादरीकरण केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण हे सर्व कार्यक्रम पक्षाच्या झेंडय़ाखाली नव्हते. कॉंग्रेस नेत्याच्या कार्यक्रमासाठी एका उद्योजकाने पुढाकार घेतला होता.
औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे म्हणत आमदार सतीश चव्हाण यांना शरद पवार यांनी पुढे केल्यानंतरच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ऊठबस वाढू लागली आहे. डाव्यांच्या उंच सुरांना राष्ट्रवादीचीही साथ मिळू लागली आहे.