राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय व कौटुंबिक नातं सर्वश्रुत आहेच. त्यामुळे हे दोघं भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर येणार म्हटल्यावर त्याची राजकीय वर्तुळासोबतच बीडमध्येही जोरजार चर्चा होणं ओघानंच आलं. त्याप्रमाणे परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले. मात्र, त्याचबरोबरीने पंकजा मुंडे व धनंजय मुंडेही व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर बीडचे पालकमंत्री व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनीही तेवढ्याच मिश्किल टिप्पणीनं उत्तर दिलं. त्यावरही उपस्थितांनी हसत मनमोकळी दाद दिली.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडेंनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं उधळली. “आज अनेकजण मला म्हणाले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? व्यासपीठावर मी आणि ताई एकत्र आहेत. अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र आहेत. दादाकाका आणि सुरेश अण्णा एकत्र आहेत. भय्यासाहेब आणि लक्ष्मण अण्णा एकत्र आहेत. असं सगळं पाहिल्यावर मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय हे निश्चित आहे. आम्ही सगळे मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू”, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“कोकणाला कोका-कोला दिला, आम्हाला किमान…”
दरम्यान, यावेळी धनंजय मुंडेंनी मिश्किल पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे कोकणाप्रमाणेच बीडमध्येही प्रकल्प देण्याची विनंती केली. “माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे, की तुम्ही कोकणात कोका-कोला प्रकल्प नेला. आम्हाला बीडच्या एमआयडीसीमध्ये फेंटा प्रकल्प तरी द्या”, असं ते म्हणाले.
…आणि धनंजय मुंडेंनी भाषण आवरतं घेतलं!
भाषण चालू असताना धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे बघताच त्यांनी हातावरच्या घड्याळाकडे बघितलं आणि धनंजय मुंडेंनी जाहीरपणे त्याचा उल्लेख करत भाषण आवरतं घेतल्याचं दिसून आलं. भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी “अजितदादा तुम्ही उपमुख्यमंत्री असताना…” असं म्हणत अजित पवारांकडे बघितलं आणि लागलीच श्रोत्यांकडे बघून ते म्हणाले, “आता दादांनी घड्याळ बघितलंय म्हणजे मला कळालं”! पुढच्या काही मिनिटांतच धनंजय मुंडेंचं भाषण संपलं आणि अजित पवार भाषणासाठी उभे राहिले.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसमवेत व्यासपीठावर उपस्थित राहण्यावरून केलेल्या मिश्किल टिप्पणीचीही चर्चा होऊ लागली आहे. “मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होतं. मला वाटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढं गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघंही परळीच्या या एका मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा इथे थोडा पारा जास्तच वाढलाय. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आलेले आहेत”, अशी टिप्पणी पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणादरम्यान करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!