महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांसह भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी भगवानगड परिसरातील नागरिकांनी १११ किलो फुलांचा हार तयार केला होता. धनंजय मुडेंना हार घालण्यासाठी चक्क क्रेन मागवण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने हा १११ किलो फुलांचा हार घालून धनंजय मुंडे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

भक्ती व शक्तीचा संगम समजल्या जाणाऱ्या भगवानगडाला मराठवाड्याचा राजकीय ऊर्जास्रोत मानले जाते. परंतु काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना येथे येण्यापासून अडवणूक करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु याच गडावर सन्मानाने निमंत्रित करण्यात आल्याने हा क्षण आपल्यासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“गडाला कधीही काहीही मागायची गरज पडू देणार नाही”
“याच भगवानगडावर काही वर्षांपूर्वी दगड फेकले गेले. मात्र आज गडाच्या महंतांनी स्वतः निमंत्रित करून बाबांचे आशिर्वाद घ्यायला मला गडावर बोलावले हे माझे भाग्य असून, ही किमया भगवनबाबांच्या मुळे घडू शकली. मी येथे राज्याचा मंत्री नाही तर बाबांचा भक्त म्हणून गडावर आलो आहे. या गडाला कधीही काहीही मागायची गरज पडू देणार नाही व भगवानगड हा कायम राजकारणमुक्तच राहील,” असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

गडावर राजकारण होणार नाहीच – महंत नामदेव शास्त्री
धनंजय मुंडे यांचे भगवानगड येथील गुरू परंपरेत स्थान आहे. धनंजय हे गडाचे निस्सीम भक्त असून हा गड सर्व भक्तांना दर्शनासाठी कायम खुला आहे. मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे या गडावर कधीही राजकारण होणार नाही असे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं.

Story img Loader