राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. तसंच हा हल्ला मला घाबरवण्यासाठी होता, मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी महिलांच्या पाठीशी आहे आणि अशीच कायम उभी राहणार असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी रोहिणी खडसे यांनी बोदवड नगपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी या हल्ल्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱांकडे बोट दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“थोडे दिवस आधीच निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आमचे जिल्हाध्यक्ष आणि मी मतदान केंद्रांवर फिरत होतो तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी आमच्याशी हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. आम्ही पोलिसांना याप्रकरणी निवेदनही दिलं होतं. मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याबाबतही आम्ही लेखी तक्रार दिली होती,” असं सांगत रोहिणी खडसे यांनी येथूनच हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाली असल्याचं म्हटलं.

रोहिणी खडसे यांच्या वाहनांवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरुप; जिल्ह्यात एकच खळबळ

“३१ डिसेंबरला माझे मोठे बंधू निखिल खडसे यांची जयंती असते. त्यानिमित्ताने आम्ही सूतगिरणीत जमा होतो आणि श्रद्धांजली अर्पण कतो. तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यानंतर चांगदेवला एका कार्यकर्त्याच्या हळदीला गेलो. तिथून एका पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन १०-१५ मिनिटं बसलो. त्यावेळी तुमच्याविरोधात वातावरण तयार केलं जात असून, काहींनी तुम्हाला फिरु देणार नाही असं सांगत पदाधिकाऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. मी त्यांना काळजी करु नका असं सांगितलं होतं,” अशी माहिती रोहिणी खडसे यांनी यावेळी दिली.

“एका शॉर्टकटच्या रस्त्यातून निघत असताना आमच्यासोर तीन दुचाकी आल्या. आमची गाडी अडवली. एकी दुचाकीवर तीन, आणि इतर दोन्हींवर दोन-दोन असे सात लोक होते. चालक गाडीवर बसून होते. मागे बसलेले चौघं गाडीच्या दिशेने आले. यावेळी एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार आणि एकाच्या हातात रॉड होता. ते माझ्या बाजूला आले, एकाने माझ्यावर पिस्तूल रोखून धरलं होतं. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडत नसल्याने त्यांनी रॉड काचेवर मारला. मी खाली वाकले म्हणून वाचू शकले. मला जीवे ठार मारण्याच्या हेतूने आले होते हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी माझ्याच बाजूने हल्ल्याचा प्रयत्न केला,” असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

“मी ड्रायव्हरला गाडी पळवायला सांगितली. पोलीस येईपर्यंत ते लोक फरार झाले होते. घरी पोहोचल्यावर गाडीचं किती नुकसान झालं हे कळालं. या घटनेत शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांची नावं तक्रारीत दिली आहेत. माझा न्यायव्यवसथेवर विश्वास आहे,” असं रोहिणी खडसे यांनी सांगितलं.

शिवसेचेने ते पदाधिकारी कोण ?

शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई हे तिघं या हल्ल्यात सहभागी होते असं रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे. “हातात पिस्तूल असणारी सुनील पाटील नावाची व्यक्ती होती, त्याने काही दिवसांपूर्वी माझ्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन हात ओढण्याचा प्रकार केला होता. ज्याच्या हातात तलवार होती तो पंकज कोळी चांगदेव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. छोटू भोई नावाच्या व्यक्तीने रॉडने हल्ला केला. इतर चौघांनाही मी ओळखू शकते,” असं रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे.