जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील भाजपाच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. याचं कारण म्हणजे मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला आहे. एकनाथ खडसे यांनी नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य केलं असून आणखी चार नगसेवक प्रवेश करणार असल्याचा शिवसेनेचा दावा फेटाळला आहे.

भाजपाचे आणखी चार नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत, असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी मात्र दावा फेटाळला आहे. तसंच सहा नाही तर पाच नगरसेवकांनी प्रवेश केल्याचं ते म्हणाले आहेत. “जे नगरसेवक गेलेले दिसत आहेत त्यापैकी फक्त चार नगसेवक चित्रात दिसत आहेत. अपक्षासहित एकूण पाच नगरसेवक गेल्याचं दिसत असून त्यातील तीन नगरसेवकांविरोधात अतीक्रमण केलं, बनावट दाखला जोडला या कारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु आहे. एक नगरसेविका चार मुलं असल्याने आधीच अपात्र ठरली आहे,” असे एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- जशास तसं! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

अपात्रतेच्या भीतीपीटी हे नगरसेवक गेले आहेत असा दावा एकनाथ खडसेंनी केला असून नऊ नगरसेवक माझ्यासोबत आहेत असा दावाही केला आहे.

आणखी वाचा- मुक्ताईनगरमधील भाजपचे नगरसेवक शिवसेनेत

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
“मुक्ताईनगरमधील भाजपाचे नगरसेवक एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीत जातील असंच सर्वांना वाटत होतं. पण त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला त्याचा आनंद आहे. यानिमित्ताने भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीत आले याचा एकनाथ खडसे यांनाही आनंदच होईल,” अशी आशा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader