गेल्या चार दिवसांपासून विरोधक एकनाथ खडसे यांना ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत. पण मी कोणताही गुन्हा केलेला नाही, सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. गेल्या ४० वर्षांपासून तुम्ही सर्व मला ओळखत आहात. ४० वर्षात मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपामध्ये कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादीत आल्यावर मला समजलं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“एका व्यक्तीच्या कट कारस्थानातून माझ्यावर आरोप झाले. मी बी एच आर पतसंस्थेचे गैरव्यवहार बाहेर काढले म्हणून माझ्या मागे ईडी लावण्यात आली,” असा आरोप करत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे गिरीज महाजन यांच्यावर निशाणा साधला. “माझ्याकडे मी इन्कम टॅक्स भरतो याव्यतिरिक्त जर इतर बेहिशोबी मालमत्ता असेल तर मी ती जाहीरपणे यांना दान करीन. काहीही करा आणि एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाका असं कारस्थान सुरू आहे. परंतु मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही,” असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
कार्यक्रम सुरु असतानाच कार्यकर्ते म्हणाले ‘टरबूज’; एकनाथ खडसेंनी अशी दिली प्रतिक्रिया
“गेली ४० वर्षे मी दिवसरात्र एक करून भाजपाचा विस्तार केला, तरी माझ्यावर पक्ष सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ आणण्यात येते तर भाजपामधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार? मी संकटात असताना शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांनी मला भक्कम साथ दिली. मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराचा शब्द दिला आहे. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने मला तो खरा करून दाखवायचा आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
फडणवीसावंर टीका करताना जीभ घसरली
एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत असताना तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘टरबूज’ असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यावर एकनाथ खडसेंनी मला माहिती नाही असं म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “पण मला एक माहिती आहे. इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण? असं टाका. इथून घरी गेल्यानंतर सर्वात आधी हे काम करायचं”.
गिरीश महाजनांवर निशाणा
एकनाथ खडस यांनी यावेळी जामनेरवाल्याने माझ्या मागे ईडी लावली असं म्हणत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “जामनेरवाल्याचं ऐकून माझ्या मागे ईडी लावली. नाथाभाऊच्या मागे इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिंबधक विभागाला लावायचं. घरी दोन वेळा इन्कम टॅक्सवाले येऊन गेले. एकदा तर धाड टाकली होती. मी फार्म हाऊसवर राहत असल्याने तुम्हाला माहिती नाही. लाचलुचपत विभागाने तपास केला असून कोणताही चुकीचा व्यवहार झालेला नाही. न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला असून कोणताही गुन्हा झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.