भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करताना असताना पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबावर सातत्याने अन्याय होत असल्याची टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!
“मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं,” असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर –
“पंकजा मुंडे काय बोलल्या ते मी ऐकलेलं नाही, पण त्या नाराज असतील असं वाटत नाही. पक्षश्रेष्ठी गांभीर्याने विचार करतील आणि त्यांना अजून मोठं पद मिळेल,” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया दिली. “मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रीमंडळ बनवायचं असतं, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसतं. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावं”, असं त्या म्हणाल्या.
“मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. कदाचित अजून पात्रतेचे लोक असतील. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.