पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून राज्यातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली असून जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवल्याचं म्हटलं आहे.
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. परंतू पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवलं आहे,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे.