शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेललं ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून एकमेकांना यासाठी जबाबदार धरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटासोबतच शिवसेनेलाही सुनावलं आहे. तसेच, राज्यात गेल्या ३०-४० वर्षांत अशा घडामोडी कधीही पाहिल्या नाहीत, असंही ते म्हणाले. कल्याणमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रकतिक्रिया दिली.
“सध्या शत्रुत्व असल्यासारखं सगळं चालू आहे”
“राज्यातलं वातावरण राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. असं राजकारण गेल्या ३०-४० वर्षांत राज्यात कधीही पाहिलं नाही. एकमेकांच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर आरोप करणं हे कधीही झालं नाही. विरोधासाठी विरोध व्हायचा. पण नंतर सगळे एकत्र यायचे. आता शत्रुत्व असल्यासारखं सगळं चालू आहे. चिन्ह गोठवणं, आपल्याच पक्षात अशी बंडखोरी करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात..”
“आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत केली. धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्यबाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा”, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.
पाहा व्हिडीओ –
“वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं, ते एका मिनिटात मुलांनी घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. पण निवडणूक चिन्ह तात्पुरतं का होईना, गोठवलं जाणं हे क्लेशदायी आहे”, असंही ते म्हणाले.