नंदुरबारमधील राष्ट्रवादीचे नेते डॉ.विजयकुमार गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गावित यांनी दोन दिवसांपूर्वी चक्क महायुतीच्या व्यासपीठावरून मोदींवर स्तुतीसुमने उधळत काँग्रेसवर टीकास्त्रही केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने गावित यांचे पक्षातून निलंबन केले आहे.
विजयकुमार गावित यांची कन्या डॉ.हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि हीना गावित यांना नंदुरबार मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर झाली. मंत्रिमंडळातून बाहेर होताच डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या मुलीसाठी भाजपच्या खुल्या व्यासपीठावरुन प्रचार सुरु केला. भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळविणाऱ्या हिना यांची स्वागत फेरी आणि सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा विरोध झुगारुन डॉ. विजयकुमार गावित यांनी सहभाग घेतला.
त्यामुळे गावित यांची प्रथम मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. आज गावित यांना पक्षाने थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे.