महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त आज कराडमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आज विविध विकासकामांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. राजशिष्ठाचाराप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण देणे आवश्यक असून कराड आणि आजूबाजुच्या परिसरातील विकास कामांमध्ये अजित पवारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
”महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकारने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून ही कामे झाली आहेत. तहसीलच्या इमारतीचे कामकाज दोन वर्षांपासून सुरु आहे आज त्याचे लोकार्पण होत आहे. राजशिष्ठाचाराप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण मिळणे आवश्यक होते. कराड आणि आजूबाजुच्या परिसरातील विकासकामांमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्त प्रीतिसंगमवारील समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यानिमित्त आज कराडमध्ये कृषीप्रदर्शनीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमीपूजन, उद्घाटनही करण्यात येणार आहे.