राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
जयंत पाटील काय म्हणाले?
“महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी सर्वात कमी जागा घेतल्या. मात्र, सर्वात जास्त जागा निवडून आणल्या. महाविकास आघाडीत काही जागा आपण कमी घेतल्या, तीन चार जागा सोडल्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर शरद पवारांची लाट पाहायला मिळाली. काही लोकांची भावना होती की शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवायचं. मात्र, शरद पवारांनी झंझावाती दौरा केला हे महाराष्ट्रानेही पाहिलं. निवडणुकीचे बरेच डाव शरद पवारांना माहिती आहेत. अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील डायलॉग तुम्हाला माहिती आहे. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मेरा शरद पवार”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा : “हा भटकता आत्मा तुम्हाला…”, शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल
“मी तुम्हाला सांगितलं होतं अ गेला तर ब आहे. ब गेला तर क आहे. क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेले तरी शाळा कधी बंद होत नाही. पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात. शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो. मी हे देखील सांगितलं आहे की, माझ्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे आणि शरद पवारांनी खमकेपणा दाखवून दिलेला आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर शरद पवारांनी एवढे खासदार निवडून आणले. मग तुम्ही कुठे आहात?”, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काय म्हणाले?
“माझी तुम्हाला विनंती आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे चार महिने मोजू नका. मी व्यवस्थित काम करतो. पण जाहीर बोलायचं बंद करा. जाहीर ट्विटरवर बोलायचं बंद करा. काय असेल तर शरद पवारांना माझी तक्रार करा. शरद पवार आमच्या दोन कानाखाली मारतील. तो त्यांचा निर्णय आहे. मी चुकीचा वागलो तर जनतेवर परिणाम होईल. फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेल. पण चार महिने आपण एकदिलाने राहू आणि काम करू, पक्षात काय करायचं ते कानात येऊन सांगा. मात्र, जाहीर बोलायचं बंद करा. खासगीत बोलायचं बंद करा. टीम म्हणून काम काय असतं ते अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनवणे या सगळ्यांना माहिती आहे. हा पक्षाचा विजय आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
© IE Online Media Services (P) Ltd