राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. मुंबई येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह आदी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २५ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार काय म्हणाले?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही महत्वपूर्ण नेते आज आपल्याबरोबर नाहीत. याची खंत आणि दु:ख माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून २४ वर्ष पक्षाचे नेतृत्व करणारे आदरणीय शरद पवार यांनीही पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्यावतीने आणि आपल्या सर्वांच्यावतीने मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो”, असं म्हणताना अजित पवार यांचा कंठ दाटून आला. भाषण करताना ते काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी अनेकांनी घेतलेल्या मेहनतीबाबत बोलताना त्यांनी सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा : जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान; म्हणाले, “फक्त चार महिने, नोव्हेबंरनंतर…”
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषणादरम्यान अजित पवार गटातील नेत्यांचेही आभार मानले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “२५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. आज पक्षाचा २५ वर्षाचा पक्षाचा प्रवास होत आहे. हा प्रवास होत असताना अनेक घडामोडी घडल्या. कभी खुशी कभी गम अशा घटनाही झाल्या. मात्र, अनेक लोकांचं खूप योगदान या पक्षामध्ये आहे. काहीजण आज वेगळं घर करून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांच्यापैकी अनेक लोकांच्या कामांची नोंद आपण घेतली पाहिजे. प्रत्येकात चांगले गुण असतात. त्यामुळे त्या कामाची नोंद आपण ठेवली पाहिजे. पक्ष वाढीमध्ये त्यांचंही सर्वांचं योगदान होतं. हे आपण आज पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मान्य करून त्यांनाही शुभेच्छा देऊ”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.