शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर काही निकटच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या सुनील बागूल यांच्या समर्थकांचा पक्ष प्रवेश सोहळा १४ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तो भव्यदिव्य स्वरूपात व्हावा, याकरिता बागूल समर्थकांसह राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे. बागूलसमर्थक पक्षांतर करणार असले तरी त्यात विशेष असे कोणी नसल्याचे कळते. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पाडण्याचे मनसुबे प्रत्यक्षात येणार नसल्याची चर्चा आहे.
शिवसेनेतील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांमधील वादाची परिणती माजी जिल्हा प्रमुख सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे व महिला आघाडीच्या पदाधिकारी शोभा मगर यांचा राष्ट्रवादीत प्रवेशात झाली. बागूल यांच्या जवळ कार्यकर्त्यांचा मोठा संच असल्याने त्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याचे निमित्त साधून १४ फेब्रुवारी रोजी गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष मधुकराव पिचड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी बागूल समर्थकांनी केली आहे. या पक्षांतर सोहळ्यास फटका आपणास बसू नये म्हणून शिवसेनेने खबरदारीचे उपाय योजून महानगर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर न करण्याची दक्षता घेतली. ही यादी जाहीर न केल्यामुळे नाराजीचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण पदे मिळण्याच्या आशेवर पदाधिकारी वा शिवसैनिक पक्षांतर करणार नाहीत, असा सेनेचा प्रयत्न आहे. कोणी नाराजांनी पक्षांतर करू नये म्हणून शिवसेनेने ही यादी जाहीर केली नसल्याचा पुनरुच्चार बागूल यांनी केला आहे. यादी जाहीर करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने सेनेतील इतर मासे गळाला लावण्याचे बागूलांचे प्रयत्न काहीसे तोकडे पडले. त्यांना मानणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांची संख्या मोठी असली तरी सेनेतील कोणताही पदाधिकारी त्यांच्या गळाला लागला नसल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा