सातत्याने बदलत जाणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये ‘रोलर कोस्टर’चा अनुभव देत अखेर अमरावतीच्या महापौरपदी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले संजय खोडके यांच्या गटाच्या रिना नंदा यांची निवड झाली. उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार निवडून आले. काँग्रेसने राष्ट्रवादीला साथ न देता खोडके गटासोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला आहे.
अमरावतीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एनसीपी फ्रंटच्या रिना नंदा यांनी शिवसेनेच्या रेखा तायवाडे यांना पराभूत केले. रिना नंदा यांना ४७, तर रेखा तायवाडे यांना २१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार सपना ठाकूर यांना अवघ्या ८ मतांवर समाधान मानावे लागले. बसपच्या उमेदवार गुंफा मेश्राम यांना ३ मते मिळाली. उपमहापौरपदासाठी झालेल्या लढतीत काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार यांनी बाजी मारली. शेख जफर यांना ४७, तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या छाया अंबाडकर यांना २१ मते मिळाली. बसपचे दीपक पाटील यांना ३ मते प्राप्त झाली. या निवडीच्या वेळी राष्ट्रवादीचे, तसेच जनविकास आणि जनकल्याण आघाडीचे १४ नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीच्या वेळी दोन सदस्य अनुपस्थित होते. शेख जफर यांना उपमहापौरपदावर विराजमान होण्याची संधी दुसऱ्यांदा मिळाली असून डिसेंबर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
एनसीपी फ्रंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडे आहे. खोडके यांचे कट्टर समर्थक अविनाश मार्डीकर हे गटनेते आहेत. गटनेतेपदाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीशी जवळीक साधणारे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या गटाने महापौरपदावर दावा केला होता. राष्ट्रवादीचे गटनेते सुनील काळे यांनीही महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि काँग्रेस आम्हाला साथ देईल, असे जाहीर केले होते, पण सोमवारी रात्री काँग्रेस, तसेच संजय खोडके यांच्या गटातील नेत्यांमध्ये बोलणी झाली आणि काँग्रेसने खोडके गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे सहकार्य या निवडणुकीत मिळावे, यासाठी राष्ट्रवादीकडून बरेच प्रयत्न झाले. मुंबईहून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी करण्यात आली, पण काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी खोडके गटाला सहकार्य करण्याच्या निर्णयावर रात्री शिक्कामोर्तब केले आणि निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. खोडके गटाचे महापालिकेतील वर्चस्व कमी करण्याचा चंग त्यांनी बांधला होता, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर खोडके गटाने त्यांना आव्हान दिले आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महापालिकेत सत्ता मिळवली होती. पहिल्यांदा महापौरपद काँग्रेसकडे आणि नंतर राष्ट्रवादीला, असा सत्ताकरार झाला होता. खोडके राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत १६ नगरसेवक ठामपणे उभे राहिले. एनसीपी फ्रंटच्या मदतीशिवाय निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले. राष्ट्रवादीचे संख्याबळ सातवर आले आहे. त्यांना मदत करण्याऐवजी हमखास सत्ता स्थापन करण्यासाठी गेल्या निवडणुकीच्या वेळी खोडके यांच्यासोबत झालेल्या कराराचे पालन काँग्रेसने केले आणि त्यांना मदत केली.

Story img Loader