राज्यातील सिंचन घोटाळ्यावर राष्ट्रवादीच्या दबावामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काही बोलत नाहीत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज येथे केला. या विषयावर त्यांचे गप्प राहणे हे जनतेच्या दृष्टीने दुर्दैवाचे आहे, असे मत व्यक्त करताना विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सत्ताधाऱ्यांना पिछाडीवर नेणारे ठरले, असे त्यांनी सांगितले.
तावडे म्हणाले, न्यायप्रविष्ट बाब या नावाखाली सरकारने सिंचन घोटाळ्यावरील चर्चा विधिमंडळात रोखली होती. प्रामुख्याने राष्ट्रवादी त्यासाठी आक्रमक होती, मात्र या विषयावर न्यायप्रविष्टतेचा मुद्दा पुढे करताना अशाच अन्य विषयांवर मात्र विधिमंडळात चर्चा झाली होती. तरीही सिंचन घोटाळ्यावर चर्चा न करताच ती झाल्याचे घोषित करण्यात आले होते. या सगळ्या गोष्टी आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मात्र सरकारला ही चर्चा करावी लागली. अधिवेशन सुरू होतानाच सत्ताधारी आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विरोधी आमदारांनाही तीन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. अशा अनेक गोष्टींमुळे सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली, असे तावडे यांनी सांगितले. आदर्श घोटाळा प्रकरणाचा चौकशी अहवाल विधिमंडळाच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी मांडण्यात येणार होता, मात्र ऐनवेळी दिल्लीहून हस्तक्षेप झाल्यामुळे ते टाळण्यात आले, असा आरोप तावडे यांनी केला. ज्या दिवशी विधिमंडळात हा अहवाल मांडण्यात येणार होता, त्याच दिवशी संसदेचे अधिवेशन सुरू होणार होते. या प्रकरणात देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव आहे.
विधिमंडळात हा अहवाल मांडला असता तर शिंदे यांच्या अनुषंगाने संसदेच्या अधिवेशनात त्याचे पडसाद उमटतील या भीतीनेच विधिमंडळात हा अहवाल मांडला गेला नाही, असे तावडे म्हणाले. मात्र या विषयावर आम्ही आग्रही असून त्यासाठी राज्य सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले.
‘सत्ताधारीच
तोडपाणी
करतात’
नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यात झालेल्या चारा घोटाळ्याची आठ दिवसांत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मागच्या अधिवेशनात केली होती, अशी माहिती तावडे यांनी दिली. ते म्हणाले, गुप्तचर खात्याच्या विशेष महानिरीक्षकामार्फत सुरू असलेली ही चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही. राष्ट्रवादीच्याच एका मातब्बर नेत्याने त्यात खो घातला असून, विधिमंडळात आम्ही उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर सत्ताधारीच ‘तोडपाणी’ करू लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र हे प्रकरण आपण धसास लावू, असे ते म्हणाले.

Story img Loader