|| सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धामधूम आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित मधुकरअण्णा मुळे यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आवर्जून हजेरी लावली. मात्र, दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बूथ कमिटी सक्षमीकरण मेळाव्यास ते उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे याच दिवशी जालना येथे एका कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. जालना आणि औरंगाबाद या दोन्ही शहरातील अंतर आणि कार्यक्रमाची वेळ सहजपणे गाठता आली असती, पण जयंतराव पाटील यांनी तसे केले नाही. बूथ कमिटीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची प्रतिमा भावी मुख्यमंत्री म्हणून उजळली जावी, यासाठी ‘खासी’ रचना केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तयारीपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मराठवाडा दौरे वाढू लागले आहेत. शरद पवार यांचाही दौरा या महिन्याच्या शेवटी मराठवाडय़ात असेल.

औरंगाबादला मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमास वेळ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बूथ कमिटीच्या कार्यक्रमास अनुपस्थित कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात साधारणत: ४५ हजार कार्यकर्ते आतापर्यंत जोडले गेले आहेत. ही संख्या साधारणत: दोन लाखांपर्यंत जाऊ शकेल, असा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा आहे. बूथ बांधणीला वेग द्यायच्या काळात बूथ सक्षमीकरणाच्या मेळाव्यास न जाता कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मधुकरअण्णा मुळे यांच्या सत्काराला ते आवर्जून हजर होते. याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मधुकरअण्णा मुळे यांना साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला असला, तरी त्यांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेला व्यक्ती अशीच आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत हेवेदावे हे औरंगाबाद जिल्ह्य़ास नवे नाही. या कुरबुऱ्यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्चस्वाची किनार आहे. या मंडळाचा कारभार आता पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे पाहतात. मात्र, जाहीर कार्यक्रमात मुळे यांना पुरस्कार देणाऱ्या जयंत पाटील यांनी औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला काँग्रेसला मागितली जाईल, असे आवर्जून सांगितले होते. या मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी उमेदवारी मागितली आहे. कार्यकर्त्यांचाही तसा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा करू, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते. दोन्ही बाजूचा समन्वय राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमाला टाळले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांची अनुपस्थिती भुवया उंचवायला लावणारी होती.

काही जागांची अदलाबदल करून लोकसभेच्या जागा लढविण्यासाठीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असली, तरी त्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. उस्मानाबादहून डॉ. पद्मसिंह पाटील हे यावेळी उमेदवार नसतील, अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली. या अनुषंगाने बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘अजून तरी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी मी चर्चा केलेली नाही. अजूनपर्यंत उमेदवारीच्या पातळीवरच्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत.’ मात्र, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला लोकसभेसाठी उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. बीड जिल्ह्य़ात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे सुरेश धस भाजपवासी झाल्याने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार शोधावा लागत आहे. यावेळी मराठवाडय़ातून अधिक जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. त्याचा भाग म्हणून सुरू असणाऱ्या दौऱ्यात शरद पवार यांचा दौराही आहे. २५ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात केलेल्या पुनर्वसनाचे कार्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्याप्रीत्यर्थ  कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर बीड जिल्ह्य़ात एका राजकीय मेळाव्यासही पवार उपस्थित राहणार आहेत.

क्षीरसागर यांच्याकडे लक्ष

भूकंपाला २५ वर्षे होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार बीड जिल्ह्य़ातील एका कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या आरतीला आवर्जून हजेरी लावणारे जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहतील का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.