Jayant Patil Bhokardan Speech: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यातील सणांचं कारण देत निवडणूक आयोगानं निवडणुका दिवाळीनंतर घेतल्या जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. विविध पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून जनमत चाचपायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानेही नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहेत. जालन्यातील भोकरदनमध्येही अशाच सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले!
काय घडलं भोकरदनच्या सभेत?
शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेसाठी पक्षाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. जालन्यातील भोकरदनमध्ये रविवारी संध्याकाळी यात्रेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे व पक्षाचे स्थानिक नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी इतर नेत्यांची भाषण झाल्यानंतर जयंत पाटलांनी भाषणाला नकार दिला. समोर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी संतप्त शब्दांत सुनावलं.
इतर नेत्यांची भाषण चालू असताना अचानक समोरच्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून लोकांनी गोंधळ घातल्याचं जयंत पाटलांनी नंतर व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रियेतून समोर आलं. त्यावरून जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं.
काय म्हणाले जयंत पाटील?
समोरच्या गोंधळामध्ये जयंत पाटलांना भाषणासाठी आमंत्रित केलं असता त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. “माझं म्हणणं आहे की आता उशीर झाला आहे. दुपारी २ पासून तुम्ही इथे थांबले आहात. तुमचे पेशन्स संपलेले आहेत. राजेश भय्य्यांचं चांगलं भाषण झालं आहे. माझ्या भाषणाचं काही फार महत्त्व नाही. त्यामुळे आपण आता सभा संपवुयात. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा”, असं जयंत पाटील वैतागून म्हणाले.
दरम्यान, कार्यकर्त्यांचा आग्रह चालूच असल्यामुळे शेवटी जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. “तुमच्यात काही शिस्त नाहीये. हुल्लडबाजी जास्त आहे. मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाहीये. खरं सांगू का मी? मला हे चालत नाही. ही पद्धत नाहीये. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणं होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येनं इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालताय?” असं जयंत पाटील म्हणाले.
“कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरलं म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? इथे रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा? काय चाललंय? असं राजकारण असतं का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे?” अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
© IE Online Media Services (P) Ltd