राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेमध्ये केलेल्या विधानावरून सध्या बराच वाद सुरू झाला आहे. ब्राह्मण महासंघानं अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. त्यातच आज ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयासमोर आंदोलन केलं. भाजपानं देखील यासंदर्भात टीकेचा सूर लावला असताना अमोल मिटकरी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते.

मिटकरी आपल्या भूमिकेवर ठाम

मिटकरींच्या या विधानावर ब्राह्मण वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना त्यांनी मात्र त्यावर माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. “ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये”, असं मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघ आक्रमक; माफीची मागणी होताच म्हणाले, “जे माफी मागा म्हणतायत त्यांना…”!

या सर्व प्रकरणावर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यांची ती मतं असतील”, असं जयंत पाटील म्हणाले.

“..तर त्याचा मला खेद वाटतोय”

“ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा हेतू त्या सभेचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं योग्य नव्हतं. त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही. पण मंत्रपठण वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नाही. ब्राह्मण समाजासाठी आम्हाला सर्वांनाच आपुलकीची भावना आहे. त्याबाबत आमची कुणाचीही टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

जयंत पाटलांनी सांगितली ‘ती’ आठवण!

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याविषयी त्यांच्या व्यासपीठावरून झालेल्या वक्तव्याची आठवण सांगितली. “अमोल मिटकरी त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. एकदा माझ्याच मतदारसंघात आर. आर. पाटलांच्या बाबत असं भाष्य झालं. पाटील व्यासपीठावर होते. मी त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रकारे आत्ता माझ्या व्यासपीठावर काही गोष्टी घडल्या. तशी भावनाच माझी नाही. त्यामुळे ब्राह्मण समाजाने गैरसमज करून घेऊ नये अशी माझी त्यांना मन:पूर्वक विनंती आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jayant patil apologized for amol mitkari statement in sangli islampur pmw