डोंबिवलीतील भाजपाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने 170 प्राणघातक शस्त्रे जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘येणाऱ्या काळात भाजपा कशाप्रकारे राज्य सांभाळणार आहे हेच यातून पाहायला मिळत आहे’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसंच, ‘या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे’ अशी मागणीही पाटील यांनी केलीये. ‘भाजपाचे पदाधिकारीच जर अशाप्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत’ अशा शब्दांत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.


 
फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याला काल(दि.16) रात्री कल्याण क्राइम ब्रँचच्या युनिटने अटक केली. डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दुकानावर अचानक धाड टाकून पोलिसांनी दुकानदार धनंजय कुलकर्णी याच्या मुसक्या आवळल्या. या दुकानातून तब्बल १७० प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader