राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळतात. त्यावर या दोन्ही नेत्यांकडून नेहमीच प्रतिक्रिया देताना या चर्चा फेटाळण्यात येतात. मात्र, वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे या तर्क-वितर्कांना पुन्हा बळ मिळतं आणि नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू होतात. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यानंतरही या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने या चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यावेळी चौकशीच्या नावाखाली त्यांना फक्त बसवून ठेवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, रात्री बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याची प्रतिक्रिया दिली. “ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं”, असं जयंत पाटील म्हणाले.
पंतप्रधानपदाच्या चर्चांना शरद पवारांनी दिला पूर्णविराम; म्हणाले…
जयंत पाटलांची ईडी चौकशी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यांच्या चौकशीबाबत राज्यातील वरीष्ठ नेते मौन असल्याचंही बोललं जात असताना जयंत पाटील यांनी मात्र सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील सर्वच मित्रांचे फोन आले. आज सकाळीही फोन आले”, असं जयंत पाटील म्हणाले.
तब्बल ९ तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर, प्रतिक्रिया देत म्हणाले, “आता…”
…आणि पाटलांनी अजित पवारांचं नाव घेतलं!
एकीकडे जयंत पाटील यांनी “कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यांनी फोन केले असं मी सांगतोय” असं म्हणाले. पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला. माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला असता “त्यांचा फोन आलेला नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.