पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील मुख्यमंत्र्यांशी करोनाच्या स्थितीबाबत चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित होते. यावरून भाजपानं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. त्यावरून आता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना देखील जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीविशयी मुद्दा उपस्थित करत टीका केली आहे. “महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही, हे पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांमधील दहा हजार लोकाचा प्रामाणिक सर्वे घ्या मग ते सांगतील की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत, राज्याचे मुख्यमंत्री मागील जवळपास ७० दिवसांपासून कोणालाही उपलब्ध नाहीत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी खोचक निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्र्यांचं काम कुठे अडलंय असं वाटत नाही”
“मला आता चंद्रकांत पाटलांशीच बोललं पाहिजे की का ते रोज असं बोलत आहेत. कारण मुख्यमंत्री कार्यरत झाले आहेत. त्यांनी काम सुरू केलं आहे. ते झूमवरून आमच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं काम कुठे अडलंय असं मला वाटत नाही. ते व्यवस्थित काम करत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“देशातलं वातावरण बदलतंय”
दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना भाजपाला देखील टोला हाणला. “देशातलं वातावरण शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर झपाट्याने बदलत आहे. लोकं पर्याय शोधत आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसचा पर्याय निवडतायत, काही ठिकाणी सपाचा पर्याय निवडत आहेत. पण भाजपाला सोडून मतदार दुसऱ्या बाजूला झुकलेला आहे. उत्तर प्रदेशात तर मंत्रीमंडळातले मंत्री आणि काही आमदार पक्ष सोडून चाललेले आहेत”, असं देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.