शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं नवीन सरकार राज्यात स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी येत्या १९ किंवा २० जुलै रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र, अधिकृतरीत्या सरकारकडून अद्याप याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीनं थैमान घातलेलं असताना मंत्रीमंडळच अस्तित्वात नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नांदेडमध्ये अतीवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री राहिलेले जयंत पाटील यांनी आज नांदेडचा दौरा केला. यावेळी नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली. नांदेडमधल्या वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी जयंत पाटील यांनी केली.
या संपूर्ण गावांना पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे.
राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका!
दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. “राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले तर त्याआधीचे गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी अजून सरकार तयार झालेले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे? याच्यातच यांचा वेळ जात आहे, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.