Jayant Patil on Maharashtra Government: राज्य विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंकडून निवडणुकांसाठी कसून तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकांमधील निकालांमुळे सत्ताधारी सतर्क झाले असताना विरोधी पक्षांचा आत्मविश्वास या निकालांमुळे वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मविआच्या निर्धार मेळाव्यातून निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं. यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर समोरच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच व्यासपीठावरील नेत्यांमध्येही हशा पिकला!
मुंबईत आज महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांबरोबरच जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, शेकापचे जयंत पाटील असे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी भाषणातून सत्ताधारी मोदी सरकार व राज्यातील भाजपावर परखड शब्दांत टीका केली.
निवडणुका दिवाळीनंतरच?
“महाराष्ट्र सरकार घाबरणारं सरकार आहे. यांना निवडणुकांची भीती वाटतेय. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना मोठा धक्का दिलाय. यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचं धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील. १५-२० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका घेतील असा माझा अंदाज आहे. त्याआधी त्यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
सरकारी टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
राज्य सरकारकडून वेगवेगळ्या विकासकामांसाठी राबवल्या जाणाऱ्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. “१३ ऑगस्टला महाराष्ट्र मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला. ६ हजार किलोमीटरचे रस्ते आता बांधायला मंजुरी दिली. कोणतं महामंडळ रस्ते बांधणार आहे? तर महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मी आरोप केला होता की विधानभवनाच्या इमारतीसमोर एका इमारतीत या महामंडळाचं कार्यालय आहे. तिथे एक अधिकारी आणि त्याचे दोन-तीन पीए आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे दुसरं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पण त्या महामंडळाकडे ३७ हजार कोटींचे रस्ते बांधण्याची जबाबदारी दिली आहे. फक्त टक्केवारी घेऊन काम देणं हा उद्योग करणारं हे महामंडळ आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
“लोकसभा निवडणुकीआधी या सरकारने ९० हजार कोटींच्या रस्त्यांचे टेंडर काढले. जालन्यातून नांदेडला जाणारा रस्ता. ११ हजार कोटींचा अंदाजित खर्च आहे. पण टेंडर जातंय १५ हजार कोटींना. एका किलोमीटरला खर्च येतोय ८३ कोटी”, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
विरारपेक्षा चंद्रावर जाणं स्वस्त!
दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी अलिबागहून विरारपर्यंतच्या कॉरिडोअर प्रकल्पाचा उल्लेख केला. “अलिबागहून वसई-विरारला पोहोचायला ९६ किलोमीटरचं कॉरिडोअर बांधणार आहेत. २० हजार कोटींचा अंदाजित खर्च आहे. २६ हजार कोटींना टेंडर चालू आहे. एका किलोमीटरचा खर्च २७३ कोटी रुपये असेल. चंद्रावर ३ लाख ८५ हजार किलोमीटवर चंद्र आहे. नाना पटोलेंना माहिती असेल चंद्र कुठे आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हणताच व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.
“तिथे आपलं चांद्रयान फक्त ६०० कोटींमध्ये गेलं. पण अलिबागहून वसई-विरारला जायला जो रस्ता होणार आहे, त्यावरून फक्त ३ किलोमीटर जरी गेलात तरी ६०० कोटी संपतील”, असं जयंत पाटील यांनी म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
“…म्हणजे याआधी न वाचताच सह्या होत होत्या”
“राज्याचे अर्थमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मी काही आता न वाचता फायलींवर सह्या करणार नाही. याचा अर्थ आधी न वाचता सह्या झाल्या आहेत. त्यांचा स्वभाव असा नव्हता. पण परिस्थितीमुळे तसा झाला. राज्याचा अर्थसचिव प्रत्येक फाईलवर लिहितोय की काहीही मागण्या पाठवू नका. मिळणार नाही. सगळे पैसे एकाच योजनेसाठी वळवण्याची गरज आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.