नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत राष्ट्वादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी आपली छाप सोडली आहे. रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे. एकीकडे शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, एकनाथ खडसेंसारख्या नेत्यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं असताना रोहित पाटील यांना मात्र सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. त्यांच्या याच यशामुळे त्यांना लवकरच राष्ट्रवादी पक्षात मोठं पद मिळेल असं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधी सूचक विधान केलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला आज जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला. “सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या पक्षात नेहमी होते, त्यामुळे काही अडचण नाही. शेवटी पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केलं पाहिजे हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे,” असे सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांचं नाव न घेता केलं.
गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता. शिवसेना, राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीत रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. कारण स्व. आर.आर. आबांच्या नंतर पहिल्यांदाच त्यांचा मुलगा रोहित पाटील हा नेतृत्वासाठी मैदानात उतरला होता. कवठेमहांकाळचे राजकारण आतापर्यंत घोरपडे-सगरे या व्यक्तीसापेक्ष गटापुरतेच मर्यादित राहिले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तासगावचा भाग जोडल्यापासून येथील राजकारणात आबांचा गट, खासदार संजयकाका पाटील यांचा एक गट तयार झाला. बाजार समिती, जिल्हा बँकेच्या सत्तेत या गटाच्या बळावर राजकारण होऊ लागले.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार पाटील व शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली पॅनेल मैदानात उतरवले होते. जागावाटपात आबा गटाची कोंडी करून देईल त्या जागा मान्य करीत आघाडी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पाटील यांनी अवमानकारक तडजोडीला नकार देत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनेल मैदानात उतरवले. लोकांनीही या नवख्या नेतृत्वाला साथ देत तब्बल १० जागा देत आबा गटावर विश्वास दर्शवला. घोरपडे-सगरे-खासदार गटाला सत्तेपासून दूर ठेवत बदलत्या राजकारणाची दिशाही निश्चित केली.
निवडणूक प्रचाराच्या काळात रोहित पाटील यांना वय, अनुभव यांच्या निकषावर घेरण्याचे प्रयत्न खासदार व घोरपडे यांनी केला. मात्र, आता मी केवळ २३ वर्षांचा आहे, आणखी दोन वर्षांनी कोणाचेच काही शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा देत मोर्चेबांधणी केली होती. माझा बाप काढणाऱ्या विरोधकांना निकालादिवशी बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असेही रोहितने एका भाषणात सांगितले होते. मतदारांनी निवडणूक निकालाने ते खरे करून दाखविले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असूनही पक्षाच्या जिल्हा नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष न घालता ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतली होती. याची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली. यामुळे कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांचेही नाही तर केवळ रोहित पाटील या नवख्या तरुणाचे आहे असेच म्हणावे लागेल.
“मी सर्वांचा आभारी आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयानंतर दिली होती.निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. वडील ऐवजी चुकून बाप असा उल्लेख झाला होता. त्याच भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. आबांनी तसंच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेलं काम लोकांनी पाहिलं असून त्यातूनच लोकांनी हा आशिर्वाद दिला आहे”.