मराठी चित्रपसृष्टीतील काही चित्रपट हे आजही मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतात. मराठीतील कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जाणारा असाच एक चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटातील गाणी, संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या व्यक्तिरेखा तर अजरामर झाल्या आहेत. ७० रुपये वारले हा संवाद तर आजही कित्येकदा मीम्समधून येत असतो. पण या चित्रपटाची चर्चा करण्याचं कारण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेलं ट्वीट आहे.
जयंत पाटील हेदेखील या चित्रपटाचे तितकेच चाहते आहेत. त्यामुळे त्यांनीही इतर सर्वसामान्यांप्रमाणे हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांनी हा सल्ला थेट इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला दिला असल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे. चित्रपटात इस्त्रायलचा उल्लेख आहे असंही ते मिश्कीलपणे म्हणाले आहेत.
झालं असं की, इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जयंत पाटील यांची नुकतीच भेट घेतली होती. कोबी शोशानी हे भारतीय चित्रपटांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी ट्वीट करत जयंत पाटील यांना दोन बॉलिवूड चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. यानंतर जयंत पाटील यांनीही त्यांच्या ट्वीटला उत्तर देत ‘अशी ही बनवाबनवी’ पाहण्याचा सल्ला दिला.
जयंत पाटलांचं ट्वीट –
“तुम्ही सुचवलेले चित्रपट पाहण्यासाठी मी नक्कीच वेळ काढेन. बॉलिवूड चित्रपटांवरील तुमचे प्रेम खरोखरच भुरळ पाडणारं आहे. तुम्ही मराठी चित्रपटदेखील पाहा अशी मी शिफारस करतो,” असं सांगत जयंत पाटील यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी जयंत पाटील त्यांना त्यात इस्रायलचाही संदर्भ आहे असं मिश्किलपणे सांगत आहेत.
‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या चित्रपटाचा हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. पण ते यश त्यांना मिळवता आलं नाही.