भारतातील जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यासंदर्भात नेहमीच सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात चर्चा होताना पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच नागपूरमध्ये यासंदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. याबाबत मोहन भागवतांनी मांडलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहन भागवतांनाच उलट सल्ला दिला आहे. तसेच, ब्राह्मण महासंघानंही भागवतांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी देशातील जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था हद्दपार करायला हवी, असं विधान केलं होतं. “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली”, असं म्हणत ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

“वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था समाजातून हद्दपार व्हायला हवी”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन!

दरम्यान, मोहन भागवतांच्या या विधानावरून जयंत पाटलांनी टीकास्र सोडलं आहे. “निवडणुका जवळ आल्या, की अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला चुचकारणं असं धोरण काही लोकांचं असू शकतं. या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपाच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पावलं टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य करतायत, त्याची अंमलबजावणी होऊ शकेल”, असं जयंत पाटील म्हणाले.

ब्राह्मणांसंदर्भातील मोहन भागवतांच्या मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “समाजातील काही घटकांना…”

ब्राह्मण महासंघाची टीका

मोहन भागवतांच्या विधानावर ब्राह्मण महासंघानं टीका केली आहे. “त्यांचं वक्तव्य चुकीचं आणि अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. पण असं न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं. मोहन भागवतांनीच पापक्षालन करण्याची गरज आहे. इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचं पाप तुम्ही करण्याचा विचार करत आहात. तुम्ही पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही देशात जातीयवाद वाढवत आहात”, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली आहे.

Story img Loader