ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लिमविरोधी आहेत, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केला. महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले. पण, त्यात कणा नसलेला हे पहिले आयुक्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
दिवा येथील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री भेट देऊन आंदोलन स्थगित केले. त्यावेळेस बोलताना त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील त्या अधिकाऱ्याला पदावरून बाजूला करून त्याची चौकशी करण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. पण, तसे होत नाही म्हणून आयुक्तांविरोधात हे आंदोलन आहे. सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन नाही, असेही ते म्हणाले. हा लढा प्रशासनाविरोधात असून तो महापौर किंवा शिवसेनेविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका पक्षाची बाजू घेऊन महापालिका चालवू शकतो असे आयुक्तांना वाटत असेल तर मला स्वतःला रस्त्यावर उतरून आम्ही काय आहोत हे दाखवून द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. हे आयुक्त माझ्या बेरजेत आणि वजबाकीतही नाही. तसेच एमएमआरडीएची घर गरिबांसाठी होती, त्यामुळे त्यांचा शाप लागेल, असेही म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, असे माझे मत आहे. राष्ट्रवादीचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे, त्यामुळे आघाडीबाबत मी निर्णय घेणार आहे. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.