गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. काँग्रेसकडून वाढत्या महागाईचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यापासून पेट्रोल, डिझेल या इंधनाची दरवाढ देखील हऊ लागली असून त्यावरून आता वातावरण तापू लागलेलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडू लागला आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे देखील दर वाढू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक गणित बिघडू लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्वीटवरून चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकेतील वैज्ञानिकाचा शोध!
“भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघून अमेरिकेतील एका वैज्ञानिकाने हवेवर पोट भरणाऱ्या मशीन्सचा शोध लावला आहे”, असा अप्रत्यक्ष टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. “भारतीय बाजारपेठेत लवकरच ती उपलब्ध करण्याची घोषणा त्याने न्यूयॉर्कमध्ये केली आहे”, असं आव्हाडांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भारतात एकीकडे इंधन दरवाढीचा भडका उडालेला असताना रशिया-युक्रेन युद्धाचा देखील देशाच्या महागाईवर परिणाम होऊ लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.