महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये राज्यात सत्तापालट झाल्यापासून सुंदोपसुंदी सुरूच आहे. राज्य सरकारचे अनेक प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळून लावले आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वादा उभा राहिला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला असून त्याचे पडसाद थेट पुण्यातील पंतप्रधानांच्या जाहीर कार्यक्रमात देखील उमटल्याचं दिसून आलं. या मुद्द्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी केलेल्या तक्रारीचा संदर्भ..
राज्यपालांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्याच उपस्थितीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अप्रत्यक्षपणे तक्रार केली आहे. “पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“राज्यपालांना हटवणं एका मिनिटाचं काम”
दरम्यान, यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांविषयी बोलले आहेत की नाही, माहीत नाही. पण जर राज्यपालांवर नरेंद्र मोदी बोलले असतील, तर त्या राज्यपालांना इथून उचलायला एक टेलिफोन बस्स झाला. जर खरंच मनात असेल, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल आणि राज्यपाल जे बोलले, ते चुकीचं वाटत असेल, तर त्यांना इथून हटवणं एक मिनिटाचं काम आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज्यपाल?
२७ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी देखील राज्यपालांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावेळी राज्यपालांनी त्यांच्या विवाहाच्या वयाविषयी हे विधान केलं होतं. याचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आला होता.
या व्हिडीओमध्ये “राज्यपाल हे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय. त्यांचे पती १३ वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील”, असं विधान त्यांनी केल्याचं दिसत आहे.