राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधकही यावरुन आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान यानंतर भाजपा आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांना भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

आव्हाड यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या ओबीसी सेलचे काही कार्यकर्ते आज बुधवारी मोर्चा घेऊन येण्याच्या तयारीत असताना आधीच आव्हाडांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर विवियाना मॉल येथे उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. काहीवेळ येथे तणावाचे वातावरण होते. परंतु पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले –

“काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस नेहमी सावध असतात. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूने सांभाळत असतात,” असं आव्हाड म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी आपण कधीच बेसावध नसतो असंही म्हटलं.

जितेंद्र आव्हाडांनी OBC समाजाचा अपमान केल्याचा भाजपाचा आरोप; Video पोस्ट करत म्हणाले, “NCP राजीनामा…”

“मी कधीच बेसावध नसतो आणि मी डगमगणारा माणूस नाही. मी जे काही बोलतो ते मनापासून बोलतो. ‘मुंह में राम बगल में छुरी’ असा आपला स्वभाव नाही,” असं ते म्हणाले. भाजपाच्या मोर्चासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ठीक आहे ना…काढू दे मोर्चा. जेव्हा खरा मोर्चा काढायची वेळ होती तेव्हा ते रथयात्रेत होते. हे असं सर्व होत राहतं”.

“पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा…,” जय भीम म्हणत जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा; नेमकं झालंय काय?

दरम्यान जितेंद्र आव्हाडांना त्यांनी धमकीवजा इशारा देत केलेल्या ट्वीटसंबंधी विचारण्यात आलं असता म्हणाले की, “तो इशारा नव्हता…अन्यथा मी घरातून निघून जाईन असं म्हणणं होतं. तुम्ही त्याला इशारा समजत आहात. मला मारलं बिरलं तर लफडं व्हायचं म्हणून तर मी ९ वाजता घऱ सोडून आलो”. माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून कार्यकर्ते जमले आहोत असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं समर्थन केलं. तुमच्या चाळीत एखादं लफडं झालं आणि तुमच्या अंगावर कोण आलं तर चाळकरी खाली उतरतात ना? असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.

याआधी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी अन्यथा असा उल्लेख करत अप्रत्यक्ष इशाराही दिला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं-

“उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी २ बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……जय भीम!,” असं जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

कोणत्या वक्तव्यावरुन वाद ?

“ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,” असं आव्हाड म्हणाले होते.

भाजपाचं म्हणणं काय?

“ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का?”, असा प्रश्नही भाजपाने उपस्थित केलाय. तसेच “राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?,” असा प्रश्नही भाजपाने विचारलाय. या ट्विटमध्ये आव्हाड आणि राष्ट्रवादीची अधिकृत ट्विटर हॅण्डल टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jitendra awhad on bjp protest outside home over statement on obc sgy
First published on: 05-01-2022 at 13:12 IST