राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आले आहेत. दरम्यान पुढील निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. ते नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे शरद पवारांनी खासगीत सांगितलं असल्याचाही खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार खासगीत काय म्हणाले –

पुण्यात आपल्या मित्रांसोबत खासगीत बोलताना २०२४ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

“मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण हे खपवून घेणार नाही,” जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला भरकार्यक्रमात इशारा

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही

“शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असतो, त्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यात अडचण येते, असं बाहेर पसरवलं जात आहे. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसून उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे,” असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. “निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शिवसेनेवर टीका

असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

…खपवून घेतलं जाणार नाही

शिवसेना मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आदर करु, मात्र बोलायचं एक आणि करायचं एक हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला. “आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची, मात्र तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp jitendra awhad sharad pawar 2024 election cm uddhav thackeray sgy
Show comments