श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडल्याचं जाहीर केल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. श्रीनिवास पवार अजित पवारांचे बंधू असून आत्तापर्यंत ते अजित पवारांच्या पाठिशी उभे होते. मात्र, शरद पवारांविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे व्यथित झाल्याचं नमूद करत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राडकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यासंदर्भात दोन व्यक्तींचा उल्लेख केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही ९ शी बोलताना यासंदर्भात अजित पवारांवर परखड शब्दांत टीका केली. “त्यांनी जे भूमिका म्हणून पत्र लिहिलं, त्यात शरद पवारांचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी लिहिलं की ‘मला राज्याच्या राजकारणात अपघाताने यावं लागलं आणि माझ्यासारख्या युवकाची त्यावेळी महाराष्ट्राला गरज होती’. पण त्याच काळातले जयंत पाटील, आर. आर. पाटील असे अनेक नेते राजकारणात आले. ९०च्या दशकात अनेक तरुण राजकारणात आले. ते कधीच स्वप्न पडलं होतं वगैरे म्हणाले नाहीत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“५ हजारांत स्वत:ला विकणाऱ्या अजित पवारांच्या कानाला लागणारे लोकांमुळे हा घोटाळा झाला. मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये. पण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्या कानाला कोण दोघं लागायचे. ज्यांचे आधीच भाजपाशी संबंध होते.ते होते आमच्या पक्षात, पण काम करायचे भाजपाचं. असे दोन जण आहेत”, असं सूचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं. त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? याविषयी आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
“सख्खा भाऊ हे बोलतोय यासारखं दु:ख नाही”
दरम्यान, श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. “यांनी ऋणानुबंधांच्या दोरखंडांवरच उभी तलवार मारली. अडचणीत असताना कोण पाठिशी उभं राहिलं, कुणी आधार दिला ते हात आणि तो आधार कधीच विसरायचा नाही. विसरलात की तुम्ही किती कृतघ्न आहात हे दिसतं. आज श्रीनिवास पवारांचं जे ६ मिनिटांचं भाषण आहे, त्यात फक्त कृतघ्नतेचाच उल्लेख दिसतो. कृतज्ञता दिसतच नाही. हा माणूस किती कृतघ्न आहे हे सख्खा भाऊ बोलतोय यासारखं दु:ख नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”
“शरद पवारांना सोडून जाणारे कशासाठी, कुणासाठी, का गेले, किती वर्षांपासून नियोजन करून गेले हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याबद्दल कधीच दु:ख बाळगू नये. पण अजित पवार ज्या पद्धतीने शरद पवारांबद्दल बोलत होते, ती पद्धत चुकीची होती. अशा खूप आतल्या गोष्टी आहेत, ज्या शरद पवारांनी यांच्यासाठी केल्या आहेत”, असं जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं.