देशात वाढती महागाई आणि त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडू लागलेलं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना देखील तुफान वेग आलेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यांचा कलगीतुरा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांच्या सभा अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका मांडली जात असताना त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक”

घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर टीका केली. “यांना भोंग्यांवर, जातीवर, धर्मावर बोलायचं असतं. भारताच्या नागरिकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका या पाचही देशांचं धर्मव्यवस्थेमुळे, जातीवादामुळे, समूहवादामुळे काय वाटोळं झालं आहे. त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक”, असं आव्हाड म्हणाले.

“आम्ही पेट्रोल-डिझेल, घरातला गॅस यांच्या वाढलेल्या किमती विचारात घेत नाही. पडलेल्या रुपयाबद्दल मोदी काय म्हणाले होते ते आम्ही विचारात घेतलं नाही. ‘देश का रुपया जब गिरता है, तब देश की इज्जत उतरती है’, असे त्यांचे बोल आहेत. आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदा रुपया इतका खाली गेला आहे. त्यामुळे आता माझ्या पद्धतीने तर मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताची चड्डीच काढली आहे. त्यावरही कुणी बोलत नाही”, असं आव्हाड म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा ‘भोंगापती’ म्हणून केला उल्लेख

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांचा ‘भोंगापती’ असा उल्लेख करत निशाणा साधला. “देशात जे काही सुरू आहे, ते संविधान विरोधी आहे. ज्या पद्धतीने काही दिवस एक भोंगापती ओरडतोय, मला या भोंगापतीचं खूप हसू येतं. त्याच्यामुळे मुस्लीम समाजाने निर्णय घेतला की अजान करायचीच नाही. भोंगे बंद. पण शिर्डीची काकड आरती बंद झाली, विठ्ठल रखुमाईची आरती बंद झाली. गावोगावचे कीर्तन-भजन बंद झाले. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जातो, तो स्वत:च कसा खड्ड्यात पडतो, त्याचं उदाहरण म्हणजे हा भोंगापती”, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

“आम्ही निर्णय घेतला तर अशा लोकांची थोबाडं बंद करायला…”, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

“काय मिळवलंय यातून? हिंदू-मुसलमान वाद पसरवण्यासाठी तुम्ही भोंगा उकरून काढला. सर्वात जास्त नुकसान हिंदूंचं झालं. मग तुम्ही म्हणाल जितेंद्र आव्हाड हिंदू आहे का? हो मी जन्मानं आणि मरणानं हिंदू आहे. पण ते लोक माझ्यासाठी हिंदुत्ववादी आहेत, जे वसुधैव कुटुंबकम्, हे विश्वचि माझे घर म्हणतात. इतरांना आपल्यापेक्षा तुच्छ लेखणारं हिंदुत्व मला मान्य नाही. या तुच्छ लेखण्यातूनच बाबासाहेबांचं संविधान जन्माला आलं”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

Story img Loader