राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं असून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. आज शेवटच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप व दावे-प्रतिदाव्यांमुळे नागपूर विधिमंडळ परिसरातील वातावरण तापल्यातं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला परखड सवाल केला.
“अधिवेशनाचं फलित शून्य”
“अधिवेशनाचं फलित काय असं कुणी मला विचारलं तर मी सांगेन शून्य. सरकारकडून विदर्भवासीयांना काहीच देण्याचा प्रयत्न झाला नाही. एक अधिवेशन नागपूरला घेण्यामागची भूमिका ही होती की या अधिवेशनातून विदर्भवासीयांचा विचार होईल आणि विदर्भाला मदत केली जाईल. पण असं काहीही या अधिवेशनात घडलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अनिल परब यांनी अधिवेशनात केला गौतमी पाटीलचा उल्लेख; म्हणाले, “राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…!”
५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या!
दरम्यान, यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला. “या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी १७ हजार कोटींची तूट दाखवली. पण गेल्या अधिवेशनात ४४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या. या अधिवेशनात ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या. आता ते सगळे मिळून १ लाख १६ हजार कोटी सरकार आणणार कुठून? घोषणा करून फक्त कागदावर सांगण्यात अर्थ नाही. लोकांच्या हातात काय जातं? हे महाराष्ट्राला नेमकं माहिती आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“एका शेतकऱ्यानं पत्र पाठवलं होतं की पीकविम्याचे फक्त ५२ रुपये मिळाले असून ते परत करण्यासाठी अधिवेशनात येण्याची परवानगी मिळावी. हे मुंबईत ४०० किलोमीटरचे रस्ते बनवू असं म्हणतात. काय गंमत वाटते का? मुंबईतल्या रस्त्यांचे टेंडर सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना देण्यात आले. मुंबईच्या कंत्राटदारांवर दबाव टाकण्यात आला की तुम्ही निविदा भरायची नाही. समृद्धी महामार्गावरील अपघातांवर कुणीच बोलत नाही. स्वत:चे आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना अर्थसंकल्पातून खोके देण्यात आले”, अशा शब्दांत आव्हाडांनी सरकारवर टीकास्र सोडलं.
“रुसवा-रुसवीतच सरकारचा निम्मा वेळ जातोय”
दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. “यांच्याकडे कधी हा रुसतो, कधी तो रुसतो. रुसवा-रुसवीतच सरकारचा निम्मा वेळ जातोय. बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना कधी इकडे धावावं लागतं, कधी तिकडे धावावं लागतं. त्यात महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे हे तीन टाळ्यांचं सरकार महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण आहे”, असं आव्हाड म्हणाले.