गेल्या महिन्याभरापासून सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणीसह अनेक गावांना महाराष्ट्रात यायची इच्छा असून कर्नाटक सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर तात्पुरता तोडगाही काढला. मात्र, तरीही सोमवारी पुन्हा एकदा सीमाभागात कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला. यामुळे वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
‘ते’ ट्वीट आणि दावे-प्रतिदावे!
२३ नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले होते. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून केलेली वक्तव्य भावना भडकवणारी आहेत. त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. आमचं सरकार आमच्या सीमा, पाणी आणि जमिनीचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे”, असं बोम्मई या ट्वीटमध्ये म्हणाले होते. या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यानंतर अमित शाह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हे ट्वीट फेक असल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.
खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हे ट्वीट फेक असल्याचं सांगितलं. मात्र, अधिकृत ट्विटर हँडलवरून फेक ट्वीट कसं होऊ शकतं? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘या ट्वीटमागे कोण आहे, हे कळलंय’ असं सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सराकारवर हल्लाबोल केला आहे.
“बोम्मईंमुळे तुमचे कपडे…”, जितेंद्र आव्हाडांनी शिंदे सरकारला खडसावलं
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाडांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांचा संदर्भ या ट्वीटमध्ये दिला आहे. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघेही खोटे बोलून जनतेला वेड्यात काढत आहेत. त्या ट्वीटमुळे कर्नाटकमधील मराठी माणसाला मार खावा लागला, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे”, असं आव्हाडांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे ट्वीट नेमकं कुणी केलं? का केलं? किंवा ट्वीट व्हायरल झाल्यानंतर इतक्या दिवसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ते फेक आहे हे कसं समजलं? अशा अनेक मुद्द्यांवर आता चर्चा सुरू झाली आहे.