एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे “आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत, पण चुकीची दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही”, असं म्हणत शरद पवारांनी देखील आंदोलनावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी हात जोडून चर्चेच्या तयारीत असलेल्या सुप्रिया सुळेंचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यासंदर्भात बोलताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान”
सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला असा केला आहे. “आज सिल्व्हर ओकवर जो हल्ला झाला, तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये मतभेद जरूर होते, आहेत राहतील. पण मनभेद कधीच नव्हते. आपण एसटी कर्मचाऱ्यांचा विचार केला, तर गेली ५० वर्ष या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं जणूकाही नेतृत्वच एसटी कर्मचाऱ्यांनी केलं. एखाद्या चुकीच्या हातात राजकीय नेतृत्व गेलं, की त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे आज दिसलंय”, असं आव्हाड म्हणाले.
“शरद पवारांची नात, पत्नी घरात होत्या…”
“आज शरद पवारांची नात, पत्नी घरात होत्या. दोघीही टीव्ही बघत होत्या. शरद पवार असताना किंवा नसताना पोलीस घराला कधी गराडा घालत नाहीत. कारण त्यांचा जनतेवर प्रचंड विश्वास असतो. असं असताना एखाद्याच्या घरावर त्यांची पत्नी, नात घरात असताना तुम्ही असा क्रूर हल्ला करता, हा अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. आमच्यातला एकही कार्यकर्ता प्रत्युत्तर वगैरे काहीही करणार नाही. शरद पवारांनी निरोप दिला आहे की काही झालं, तरी आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत”, अशा शब्दांत आव्हाड यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.
आव्हाडांनी सांगितली ‘ती’ घटना!
दरम्यान, यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलकांशी हात जोडून बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्याचं म्हटलं. “जेएनयूचं ७७ साली आंदोलन झालं. तेव्हा निवेदन स्वीकारायला जेएनयूच्या गेटवर स्वत: इंदिरा गांधी गेल्या होत्या. आणि त्यांचे नेते सीताराम येचुरी होते. हा भारताचा इतिहास आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. आज त्याच इंदिरा गांधी मला सुप्रिया सुळेंच्या रुपाने दिसल्या. त्या घाबरल्या नाहीत एसटी कामगारांच्या समोर येताना. धक्काबुक्की झाली, पण त्या मागे हटल्या नाहीत. हात जोडून उभ्या होत्या. तुम्ही एका बाईला धक्काबुक्की करता? ज्या बाईच्या अंगात शरद पवारांचं रक्त आहे, ती घाबरणारी नाही”, असं आव्हाड म्हणाले.
“एका ८२ वर्षांच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, कुणीच आजूबाजूला नसताना हल्ला करणं याची महाराष्ट्रात खूप निंदा होईल. महाराष्ट्राला मान्य होणार नाही. मतभेदाचा सन्मान केला जावा, पण मनभेद असू नये. कुणाच्या घरी जाऊन त्याच्या घराच्या दरवाजावर उभं राहून दगड मारणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं देखील आव्हाड यावेळी म्हणाले.