महाराष्ट्रात एकीकडे हिवाळी अधिवेशन आणि सीमाप्रश्नाच्या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापलं असतानाच भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा सुरू झाली आहे. हिंदुंनी घराघरात धारदार चाकू ठेवायला हवा, असं विधान प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. या विधानावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. यासंदर्भात साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाचा उल्लेख करतानाच जितेंद्र आव्हाडांनी “जे पाकिस्तानचं झालं, ते भारताचं करायचं आहे”, असं म्हणत त्यांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह?
साध्वी प्रज्ञासिंह यांनी कर्नाटकमध्ये हिंदू कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात बोलताना याबाबत भूमिका मांडली होती. “लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या मुलींवर संस्कार घडवा. आपल्या मुलींना गोष्टी समजावून सांगा. एवढंच नाही तर हिंदूंनी आपल्या घरांमध्ये हत्यारं बाळगली पाहिजेत. काहीही नसेल तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावून घ्या. स्पष्टच सांगते आहे की आपल्या घरातले चाकू, सुरे जे आपण भाजी कापायला वापरतो ते धारदार असले पाहिजेत. त्यांनी चाकू भोसकून आपल्या हर्षावर हल्ला केला. त्यांनी चाकू सुऱ्यांनी भोसकून बजरंग दल, भाजपा, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतला आहे. आता शस्त्रांना धार करण्याची वेळ आपली आहे. माहित नाही कधी आवश्यकता भासेल. जर आपल्या घरातली भाजी व्यवस्थित कापली गेली तर आपल्या शत्रूची जीभ आणि त्याचं शीरही आपल्याला प्रसंगी कापता येईल”, असं साध्वी प्रज्ञासिंह यावेळी म्हणाल्या.
“हिंदूंनी घरात शस्त्रं बाळगावीत किंवा धारदार सुऱ्या तरी बाळगाव्यात” प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांचा टोला!
दरम्यान, याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भूमिका मांडली आहे. “खासदार व मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिने ‘आपल्या घरामध्ये धारदार शस्त्र, चाकू ठेवा जेणेकरून आपल्याला कधीही ते वापरता आले पाहिजेत’ असे विधान केले आहे. खरंतर तिच्यासारखं सगळ्यांनी बॉम्ब स्फोटाचंही प्रशिक्षण घ्यायला हवं. ते ठेवण्याचंही प्रशिक्षण घ्यायला हवं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“घरात फक्त चाकू नाही तर RDX, मशीनगन, स्टेनगन, एके 47, रिव्हॉल्वर सगळंच ठेवा. कारण आता आपल्याला हिंदुस्थान म्हणजेच भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे. जे पाकिस्तानचं झालं ते भारताचं करायचं आहे”, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या ट्वीटवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.