ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याभोवती सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे. २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्बंध लागू असताना बोरिस जॉन्सन यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सर्वसामान्य जनतेकडूनही पंतप्रधानांविरोधात नाराजी जाहीर केली जात आहे.
दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एका लहान मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ही मुलगी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माफी मागितली पाहिजे असं सांगत आहे.
ही मुलगी म्हणत आहे की, “त्यांनी सर्वांना घरात थांबण्यास सांगितलं, पण लॉकडाउनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन ते पार्टीसाठी गेले होते. त्यांनी यासाठी माफी मागितली पाहिजे”.
हा व्हिडीओ ट्वीट करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, “ही लहान मुलगी लॉकडाउनमध्ये पार्टी केल्याबद्दल बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात बोलत आहे. जर ती भारतात असती तर यूएपीए अंतर्गत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता”.
काय आहे प्रकरण?
जॉन्सन यांनी सन २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये डाउनिंग स्ट्रीटच्या गार्डनमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याचा दावा ब्रिटनमधील आयटीव्हीने केलाय. एकीकडे नागरिकांना घरांमधून बाहेर निघण्यावरही निर्बंध लादणाऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे पंतप्रधान मात्र पार्टी करत होते असं या वृत्तात म्हटलंय. या पार्टीच्या आमंत्रण पत्रिकांचा ईमेलच समोर आला असून मे २०२० मध्ये पंतप्रधानांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालय आणि सरकारी निवासस्थानी ‘सोशली डिस्टन्स ड्रिंक्स’ नावाखाली पार्टीचं आयोजन करण्यात येत असल्याचे ईमेल या वृत्तवाहिनीने समोर आणलेत. या प्रकरणानंतर आता विरोधी पक्षाने पोलीस तपासाची मागणी केलीय.
आधी नकार नंतर माफी…
याआधीच बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणासंदर्भात माफी मागितलीय. मात्र त्यापूर्वी जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. नंतर त्यांनी या पार्टीत आपण हजर असल्याचं मान्य केलं होतं. अखेर त्यांनी ही पार्टी म्हणजे आपल्या कार्यालयीन कामाचा भाग असल्याने आपण तिथे उपस्थित राहिलो होतो, अशी सारवासारव केलीय. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाबरोबरच प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणाची तुफान चर्चा आहे. आधी नकार आणि नंतर थेट माफी यामुळे आता या प्रकरणावरुन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जातेय.